पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिराच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या येणार असून सकाळी अकरा वाजता पूजा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून दगडूशेठ गणपती मंदिरासाठी अर्ध्या तासाची वेळ देण्यात आलेली आहे; परंतु सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान येणार असल्याने रस्त्यांच्या वापरावर बंधने येणार आहेत. पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांच्यातर्फे करण्यात आले आहे.
पंंतप्रधानांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत : दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये प्रथमच पंतप्रधान असणारी व्यक्ती दर्शनाला येत आहे. तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मंदिर ट्रस्टकडून पारंपरिक महाराष्ट्राच्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. ढोल-ताशाच्या वादनाने त्यांच्या आगमनानंतर महापूजा, महाआरती करण्यात येणार आहे. अर्धा तासानंतर पंतप्रधान पुढील कार्यक्रमास जाणार आहेत.
ऑनलाईन सुविधांचे कौतुक : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. पंतप्रधानांनी पत्र पाठवून मंडळाचे अभिनंदन केले होते. ट्रस्टने ऑगमेंटेड रिअलिटी या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा करून दिली होती. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. शुभेच्छा संदेशाचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना पाठवले होते. गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा करून दिल्याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुक केले होते. कोरोना काळातील पत्र व्यवहारानंतर पंतप्रधान आता पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिराकडूनसुद्धा पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांनी दिलेली आहे.
हेही वाचा: