पुणे- कोरोनाच्या काळातही शेतमालाची थेट बांधावर विक्री करून चांगले उत्पन्न मिळविण्याची किमया मावळमधील शेतकऱ्याने साधली आहे. जिल्ह्यातील मावळमध्ये सोशल मीडियाचा वापर करून शेतकरी शेताच्या बांधावर कलिंगड विकत आहे. सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेले कलिंगड विकत घेण्यासाठी नागरिकांची शेतात झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. नितीन गायकवाड असे या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे बाजारपेठ बंद होती. त्यामुळे प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड यांनी थेट शेतीच्या बांधावरून कलिंगड विक्री करण्याची संकल्पना त्यांनी अमलात आणली. गेल्या वर्षी त्यांनी थेट बांधावरून 23 टन कलिंगडाची विक्री केली होती. त्यातून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षीदेखील किमान एक एकर शेतीमध्ये साडेतीन लाखांचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नितीन गायकवाड मावळमधील चांदखेड येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा-कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 बियरबारवर पोलिसांचे छापे
कलिंगडे निवडण्याची ग्राहकांनी दिली मुभा-
प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड हे सेंद्रिय शेती करतात. त्यांच्या शेतात कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना गेल्या वर्षी पाऊण एकरमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूने अवघ्या भारतात थैमान घातले. यामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका बसला. तेव्हा, शेतकरी नितीन गायकवाड यांच्या शेतात कलिंगड तोडणीस आली होती. मात्र, कलिंगडे कुठे विकायची असा प्रश्न पडला होता. याचा विचार करत असताना शेताच्या बांधावरून त्यांनी कलिंगड विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच, शेतात येऊन हवे तसे आणि आकाराचे कलिंगड निवडण्याची मुभा ग्राहकांना दिल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले. चवीला गोड आणि काळसर रंगाच्या कलिंगडची ग्राहक उत्साहाने खरेदी करतात.
हेही वाचा-विद्यार्थ्यांना भाज्यांची माहिती देणारी सेंद्रीय परसबाग
निर्बंध उठवूनही शेतकऱ्यांना सुगीचे दिवस नाहीत!
दरम्यान, अशा प्रकारची सेंद्रिय शेती महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.