पुणे - शिवीगाळ करण्यावरून झालेल्या मारहाणीत एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तो रावण टोळीच्या म्होरक्याचा भाऊ आहे. त्याचा लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय २७) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
या घटनेप्रकरणी देहूरस्त्या पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून आशिष विशाल जगताप (वय २३), प्रसाद अशोक आल्हाट (वय २५), विकास गोरख तांदळे (वय २१), सागर रमेश धनवटे (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. यात अल्पवयीन आरोपीचा देखील सहभाग असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवारी सोन्या आणि त्याचे मित्र आकुर्डी पोस्ट कार्यालयासमोर असलेल्या एका गॅरेजजवळ दारू पीत बसले होते. दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाला, शिवीगळ केली आणि त्यातूनच सोन्याच्या मित्रांनी सोन्याच्या डोक्यात गॅरेजमधील साहित्याने मारले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तिथेच सोडून त्याचे आरोपी मित्र पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर अवघ्या दोन तासात देहूरस्ता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.