पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात 13 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, जिल्हाप्रशासनाच्या या निर्णयानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली.
मागील दोन दिवसांपासून पुण्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. हीच परिस्थिती आज (रविवारी) सकाळपासून भाजीपाला आणि फळांचे मार्केटयार्डमध्ये दिसली. याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक नियमांची सर्रास पायमल्ली करताना दिसत आहेत.
हेही वाचा - मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनाने निधन
सुरुवातीला जेव्हा मार्केट यार्डमधील व्यवहार सुरळीत करण्यात आले होते तेव्हा प्रवेशद्वारावरच येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मलगनद्वारे तापमान नोंदवले जात होते. सॅनिटायझरचा वापर करण्यासोबत फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबतही आवाहन केले जात होते. मात्र, आता याठिकाणी यातील एकही नियमांचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. आता याठिकाणी ना सॅनिटायझर, थर्मल गन यापैकी काहीच नाही आणि फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गर्दी करु नका, असे आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अशाप्रकारे होणाऱ्या गर्दीकडे कानाडोळा केला जात आहे.