पुणे - सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला लागले आहे. त्यामुळे राजकिय नेते प्रचार दौऱ्यात दंग आहेत. तर मतदार बळीराजा मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या झळा सोसत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळ्यात बटाटा पीकाची लागवड करत असतात. मात्र, यावर्षीचा अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
हेही वाचा - मी अस्सल महाराष्ट्रीयन, मला माझी ओळख सिद्ध करण्याची गरज नाही - फादर फ्रान्सिस दिब्रेटो
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ, कुरवंडी, थुगाव, भावडी, पेठपारगाव, कोल्हारवाडी, कुदळवाडी या सातगावांच्या पठार भागावरती दरवर्षी पाऊसाळ्यात जवळपास ५ हजार हेक्टर वर बटाटा हे महत्वाचे पीक घेतले जाते. बटाटा पीकापासून शेतकऱ्यांना चांगल्या नफ्याची आशा असते. मात्र, यावर्षी या भागात झालेल्या मुसळधार पावसाने बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनात देखील निम्नाने घट झाली आहे.
हेही वाचा - पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात
मोठ्या भांडवली खर्चातून उभे केलेले बटाट्याचे पीक सध्या काढणीसाठी आले असून मजूर मिळत नसल्याने बटाट्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे, यावर्षीचे बटाट्याचे पीक कर्जबाजारी बनवत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तर, राजकिय नेते याच मतदारांच्या जोरावर राज्यात सत्तेची गणिते करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे या कष्टकरी बळीराजाकडे लक्ष कोण देणार हा प्रश्न उसस्थित होत आहे.
हेही वाचा - जोरदार पावसामुळे पुणेकरांची दैन्यवस्था; 11 जणांचा मृत्यू तर 4 जण बेपत्ता