पुणे - अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेली बारामती गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) बरखास्त करण्यात आली आहे. मात्र, यापुढील काळात या शाखेची पुनर्बांधणी केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. आगामी कामकाजाबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या कार्यरत असलेली गुन्हे शाखा बरखास्त करण्यात आली आहे. यातील प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला नियुक्ती असलेल्या मूळ ठिकाणी कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे दुसरे पथक बारामती विभागासाठी सुरू करून अथवा या शाखेसाठी नवीन अधिकार्यांची नेमणूक करून गुन्हे शाखेची पुनर्बांधणी करण्यात येईल. सोबतच रस्ते वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रस्ते अपघातात अनेकांचे जीव जातात. त्यासाठी बारामती विभागामधील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बारामती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत सहा तालुक्यातील १५ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र येते, असे मोहिते यांनी सांगितले.
पुढे मोहिते म्हणाले, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर तसेच चारचाकी वाहनात सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जेणेकरून नागरिकांना चांगल्या सवयी लागून रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर अवैध धंद्यांचा समूळ बिमोड करण्याकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.