पुणे - शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलसाठी चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून, शहरातल्या मध्य भागातील सिग्नलवर सावलीसाठी कापडी छप्पर बांधण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
वाढलेल्या उन्हात वाहनाचालकांना सिग्नलवर थांबावे लागते. त्यामुळे वाहनचालकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून शहराच्या मध्य भागातील सिग्नलवर कापडी छप्पर बांधण्याच्या उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात फरासखाना चौक, अप्पा बळवंत चौक, सिटी पोस्ट चौक येथील ७ सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे.
प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आली आहे. पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असून सिग्नलसाठी चौकात उभ्या राहिलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याचे, हेमंत रासने यांनी सांगितले.