पुणे - भारतात असंघटित कामगारांची संख्या अधिक आहे. त्यातही महाराष्ट्रात ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या वर्गासमोर सध्या अन्न पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे, असे असतानाही अद्याप राज्य सरकारने याबाबत कोणतीही योजना काढलेली नाही. ही खेदाची बाब असल्याचे मत असंघटित कामगारांसाठी लढणाऱ्या संतुलन संस्थेचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा... 'सांगा, आम्ही जगायचं कसं?', मुंबईतील लाखो बेघरांचा प्रश्न
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र, असे असताना कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या जनतेने जगायचे कसे ? हा खरा प्रश्न असल्याचे सांगत या जनतेसाठी काही मागण्या अॅड. रेगे यांनी केल्या आहेत. या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मोफत रेशन द्यावे, प्रत्येक कामगाराच्या खात्यावर किमान रक्कम टाकावी, स्थलांतरित आणि बेघर लोकांच्या निवाऱ्याची सोय करावी, कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मोफत वैद्यकीय उपचाराची सोय करावी, तसेच कोरोनाग्रस्तांना प्रत्येकी 4 लाख रुपये द्यावे, अशा मागण्या संतुलन संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या वाघोली भागात सुमारे 1 हजार 604 असंघटित कामगार कुटूंब आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा, अशी मागणी रेगे यांनी केली आहे. पुणे शहरात देखील रस्त्यावर राहणाऱ्या अनेक कष्टकरी कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अन्न आणि औषधाची मदत करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन देखील संतुलन संस्थेकडून करण्यात आले आहे.