पुणे - कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बराच काळ लढावी लागणार आहे. या संकटकाळात समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर नक्की मात करु, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना साथरोग नियंत्रण विभागीय आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
सरकारने लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणे सुरु झाले आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याबरोबरच मोठी लढाई लढावी लागणार आहे. मान्सूनच्या काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता योग्य ते नियोजन करुन रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना मिळून समन्वयाने काम करावे लागणार असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो.
मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहराबरोबरच विभागात इतरत्र परिस्थिती निहाय उपयोगी पडेल का, याबाबत माहिती घ्या. तसेच सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागात कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. कोवीड आणि नॉन कोविड रुग्णासाठी पुणे शहराबरोबरच विभागात करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती, प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशाचे पालन, विभागातील चाचण्याची सद्यस्थिती उपलब्ध असलेले बेड्स, रुग्णवाहिका, कोराना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपायोजना याबाबत महसूल मंत्री थोरात यांनी माहिती जाणून घेतली.