पुणे- मिठाई दुकानात उघड्या ट्रेमध्ये ठेवण्यात येत असलेल्या मिठाईवर एक्सपायरी टाकण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने आदेश जारी केल्यानंतर 1 ऑक्टोबरपासून या आदेशाची अंमलबजावणी आवश्यक केली आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत अद्यापही मिठाई दुकानदारांमध्ये संभ्रम आहे.
राज्यातील अन्न आणि औषध विभागाने या आदेशाची माहिती मिठाई दुकानदार आणि त्यांच्या संघटनांना पोहचवली आहे तसेच त्यांच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. या मिठाई विक्रेत्यांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान या आदेशाची अंमलबजावणी होत असताना अनेक मिठाई दुकानांमध्ये अद्याप मिठाईसमोर एक्सपायरी लावण्यात आलेली नाही. आम्हाला नियमांचे पालन करायचे आहे, हे नियम एका अर्थाने चांगले आहेत; मात्र दुकानदारांना याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी येणार असल्याचे मिठाई दुकानदारांचे म्हणणे आहे. या संदर्भात पुण्यात मिठाई दुकानदार संघटनेकडून बैठका घेण्यात आल्या असून एक्सपायरीचे लेबल कशा प्रकारे लावायचे, लहान दुकानदाराच्या याबाबत काय समस्या आहेत, त्यांना काय अडचणी येतील याचा विचार करण्यात आला असून मिठाईवर एक्सपायरी टाकणे ही बाब चांगली आहे; मात्र सगळे योग्य पद्धतीने करायला थोडा वेळ लागेल असे दुकानदारांचे म्हणणे आहे.