पुणे - संगणक अभियंता असलेल्या महिलेने पती आणि सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी चिंचवडमध्ये ही घटना घडली. मेघा संतोष पाटील (वय-३४) असे या महिलेचे नाव आहे. तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी डॉक्टर पती संतोष नामदेव पाटील याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
मेघा यांचा पती संतोष नामदेव पाटील हा पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. मृत मेघा हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होत्या. सासरे नामदेव आणि पती संतोष हे त्यांच्या सोबत भांडण करत असत, नोकरीवरून आल्यानंतरही घरातील कामे करण्यावरून त्यांचे वाद होत. मागील अनेक दिवसांपासून मेघा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता.
हेही वाचा - दत्तात्रय वारे गुरुजींचा परिसस्पर्श, घडवली देशातील पहिली 'झिरो एनर्जी' शाळा
नवीन फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून २५ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा काही दिवसांपासून मेघा यांच्याकडे लावला होता. त्यामुळे त्यांनी शनिवारी पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. घटना घडली तेव्हा घरात सर्व जण उपस्थित होते. मेघा यांना तीन वर्षांचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी मेघा यांचे वडील सुधाकर शंकर शिंदे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी पती संतोष नामदेव पाटील, सुजाता नामदेव पाटील (सासू) आणि नामदेव पाटील (सासरे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.