पुणे - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी नगरीत जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थांनच्या वतीने उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १३ फेब्रुवारी रोजी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी पहाटेच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर कार्यकर्त्यांसह जाऊन पुतळ्याचे अनौपचारिक अनावरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पडळकरांकडून शासकीय आदेशाचे उल्लंघन
शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे असल्याचे यावेळी पडळकर म्हणाले. दरम्यान, पडळकर यांनी अनधिकृतपणे जमाव जमवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले तसेच बेकायदेशीरपणे पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना या ठिकाणावरून बाजूला केले असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. तर अनावरण सोहळा ठरलेल्या वेळेतच ठरलेल्या ठिकाणी शरद पवार यांच्या हस्तेच संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.