पुणे - सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. गुन्हे शाखा 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी विविध गुन्ह्यामध्ये कौशल्यपूर्ण तपास केल्यामुळे त्यांना गौरविण्यात आले.
हेही वाचा - दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्या आईला जीवे मारण्याचा प्रयत्न
सप्टेंबर महिन्यात शर्मा नावाच्या व्यक्तीचा तळेगाव दाभाडे येथे खून करण्यात आला होता. परंतु, गुन्हे शाखा 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात गुणात्मक तपास करत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपास पथकामध्ये पोलीस हवालदार धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, पोलीस नाईक दत्तात्रय बनसुडे, फारूक मुल्ला, संदीप ठाकरे आणि पोलीस शिपाई मयुर वाडकर सदर कर्मचारी सहभागी होते.
सप्टेंबर महिन्यातच गुन्हे शाखा 1 च्या पथकाने राजस्थानमधील वाहन चोराला पकडून अटक करत त्याच्याकडून तब्बल 1 कोटी 13 लाख रुपयांच्या आलिशान मोटारी हस्तगत केल्या होत्या. यात तब्बल 12 गुन्हे उघडकीस आणले होते. सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक उपनिरीक्षक रवींद्र राठोड, हवालदार प्रमोद लांडे, पोलीस नाईक अमित गायकवाड, अंजनराव सोंडगिर, मनोजकुमार कमले, महेंद्र तातळे, पोलीस शिपाई विजय मोरे विशाल भोईर तपासात सहभागी होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघवी ज्वेलर्स नावाचे दुकानाचे शटर उचकटून अज्ञातांनी फोडले होते. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपास करत अवघ्या 48 तासात तपास करत मुख्य आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून 22 लाख रुपयांचे ऐवज हस्तगत करण्यात आला होता. हा तपास सहायक निरीक्षक दुर्गानाथ साळी, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, हवालदार बंडू मारणे, सिताराम पुणेकर, पोलीस नाईक मनोज गुरव, अमोल गोरे महेंद्र रावते यांचा समावेश होता.
हेही वाचा - महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात; लाचेची रक्कम ऐकून व्हाल थक्क