बारामती - यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानाचा मोठ्या प्रमाणात फळबागांना फटका बसला आहे. हवामान बदलाच्या संकटावर मात करून शेतकरी नव्याने फळबागांची मोट बांधत आहे. उत्पादन कमी मिळणार असले तरी चांगला दर मिळून उत्पन्न वाढेल अशी खात्री शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सततचा पाऊस आणि ऑक्टोबर महिन्यात झालेली ढगफुटी यामुळे डाळिंब बागांचा हस्त बहर शेताला वाफसा नसल्याने वाया गेला. त्यामुळे पुढील सहा महिने बाजारपेठेत डाळिंब दिसणार नाही, अशी शक्यता कृषी अभ्यासकांमधून व्यक्त होत आहे. तसेच वाढती थंडी द्राक्ष पिकासाठी चांगली असली तरी या काळात भुरी व मिलीबग रोगामुळे द्राक्ष पिकाला धोका वाढला आहे.
पुणे जिल्ह्यात ३५ हजार ५८ हेक्टर क्षेत्र
पुणे जिल्ह्यामध्ये ३५ हजार ५८ हेक्टरवर फळबागांचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वात जास्त १५ हजार हेक्टरवर डाळिंब पीक उभे आहे. त्याखालोखाल द्राक्ष, सिताफळ, आंबा, अंजिर आदी फळबागांचे क्षेत्र जिल्ह्यात आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबलेला पाऊस व त्यानंतर सातत्याने ढगाळ हवामानाचा फटका फळपिकांना बसला आहे. थंडीची लाट, धुके या फळझाडांचे नुकसान होते. कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते. फळपिकांमध्ये फळे तडकतात. यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांमध्ये हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
सन बर्निंगमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते
केळी पिकांमध्ये घड बाहेर पास्त नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. रात्री थंडीचा कडाका तर दिवसा ऊन यामुळे अनेक फळबागांमध्ये सन बर्निंगमुळे फळांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. थंड हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यावर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशी कणांतील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तीहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात. अतिशील तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो. रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे यास बळी पडतात. कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात तसेच बेचक्यातील पेशी मरतात आणि झाडांना इजा पोहचते. तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळ्यापर्यंत पोचते.
अतिपावसाने डाळिंबाचा हस्त बहर गेला वाया
यंदाच्या वर्षी अतिपावसाने डाळिंबाचा हस्त बहर वाया गेला. तर द्राक्षाची मालकाडी परिपक्व झाली नाही.त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाचा बहर धरला नाही. तसेच सततच्या पावसामुळे शेताला वाफसा नसल्याने डाळिंबाचा हस्त बहर धरता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी डाळिंब बागांच्या छाटण्या न करता कळी धरण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी केला आहे. तर उर्वरित शेतकरी जानेवारीमध्ये आंबे बहारामध्ये डाळिंबाच्या छाटण्या करतील, अशी माहिती डॉ. राजेंद्र वाघमोडे संचालक, महात्मा फुले कृषि विज्ञान केंद्र, इंदापूर यांनी दिली.
जिल्ह्यातील प्रमुख फळपिक लागवडीखालील क्षेत्र फळपिक क्षेत्र (हेक्टरमध्ये)
डाळिंब १५, ००५; सिताफळ ३, ९१७; आंबा ४, ६५३; द्राक्ष ४, २१४; केळी १, ३९४; चिकू १, २०२; पेरू १, ४६४; लिंबू ७४१; अंजिर ७२४