पुणे - कोरोनाच्या रूग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध परिमंडळ कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त नागरिकांना येण्यास पूर्णत: बंदी घातली आहे.
महापालिकेचे प्रवेशद्वार बंद -
पुणे महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशदार बंद करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशदारावर सुरक्षारक्षकांचा फौजफाटा उभा आहे. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच आत सोडले जात आहे. अनेक नागरिकांना या आदेशाची कल्पना नसल्याने मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकांबरोबर वादविवाद करत आहेत. पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
ऑनलाईनद्वारे कामे करा -
महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबतचे कार्यालयीन आदेश सर्वांना दिले आहेत. यामध्ये निमंत्रित केलेल्या व्यक्तींना संबंधित विभागाने व कार्यालय प्रमुखांनी प्रवेश पत्र दिले असेल तरच त्यास इमारतीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांचे कोणतेही काम अडू नये यासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे तक्रार आणि सूचना या लेखी स्वरूपात ई-मेलद्वारे संबंधित खात्यास पाठवाव्यात, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'दोन तासात कसा करायचा व्यवसाय'? कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांचा प्रश्न