पुणे - अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे सहा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी
अवकाळी पावसामुळे पुणे विभागात अंदाजे 1 लाख 36 हजार 148 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागातील सांगली जिल्ह्यात 65 हजार 267 हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात 36 हजार 345 हेक्टर, पुणे जिल्ह्यात 21 हजार 681 हेक्टर, सातारा जिल्ह्यात 11 हजार 800 हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 55 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांचे प्रामुख्याने सोयाबीन, भात, जवारी, द्राक्ष बागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - चाकण खराबवाडीत किरकोळ वादातून एकाची कोयत्याने हल्ला करुन हत्या
या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, हे पंचनामे करत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधित झाले आहे, याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकांचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेवून त्या शेतकऱयांचे पंचनामे करून घेत असल्याचे प्रशासनाच्यावतीने यापूर्वीच सांगण्यात आले आहे.