पुणे - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाणारे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा आज जन्मदिवस राजगुरुनगर येथील जन्मस्थळी साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्मा राजगुरू यांच्या कुटुंबीयांसह देशभरातून अनेक राजगुरू प्रेमी, स्थानिक नागरिक उपस्थितीत होते.
भीमा नदीच्या तिरावर हुतात्मा राजगुरूंचा वाडा आहे. या वाड्याला मोठा इतिहास असून क्रांतिकारकांचा वाडा म्हणून याकडे पाहिले जाते. राजगुरूंचा जन्मदिवस, बलिदान दिवस, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राजगुरू वाड्यावर ध्वजारोहण करण्यात येत असते. यावेळी लहान मुले, नागरिक आणि महिलांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील ३ धगधगते निखारे होते. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीची शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या जात असताना या ३ रत्नांतील एक तेजस्वी "रत्न" म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरू होय. त्यांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मगावी राजगुरुनगर येथे ध्वजारोहण करत देशभक्तीपर गीतांची मैफिल करुन आज सर्वांच्या साक्षीने साजरा करण्यात आला
क्रांतिकारकराजगुरू यांचे स्मारक व्हावे, ही अपेक्षा या ठिकाणी येणारा प्रत्येक जण करत आहे. मात्र, सरकारची उदासीनतेमुळे हे स्मारक आजही दुर्लक्षितच आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या क्रांती आणि शौर्याची गाथा जगभर गायली जाते. पण या या क्रांतिकारकांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत सरकारच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक न झाल्यास पुढील काळात हे स्मारक लोकवर्गणीतून उभारू, असा इशारा सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिला.