पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, सीबीआयने तपासादरम्यान मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून, जप्त केलेल्या वस्तू तपासणीसाठी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली आहे.
याप्रकरणी सीबीआयने त्यांना २५ मे रोजी पुण्याच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना १ जून पर्यंत सीबीआय कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर त्यांना १ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी सीबीआयच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, पुनाळेकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तपासण्यासाठी त्या वस्तू न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच या खटल्यामध्ये खून, कट रचणे आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक अधिनियमानुसार तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पुनाळेकर आणि भावे यांच्या चौकशीसाठी १४ दिवस सीबीआय कोठडीची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.
मात्र, बचाव पक्षाच्या वतीने सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला होता. त्याप्रमाणेच संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी ही बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आली होती.