पुणे - इंदापूर तालुक्यातील बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहा जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राधाकिसन वर्पे (रा. वरवंडी ता. संगमनेर. जि. अहमदनगर), अंकुश विजयराव धाकडे, संगेश आर. धाकडे (दोघेही रा. सावळी बूदुक ता. अचलपूर जि. अमरावती), मनोज रावसाहेब गायकवाड, मनीष वानखेडे (दोघेही रा.ता. मोशी जि. अमरावती), महेंद्र उर्फ चिंटू शिवाजी काटकर (रा. वडापूरी ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
इंदापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत राऊत हे खासगी शाळेत शिक्षक आहेत. त्यांची पत्नी शासकीय नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विभागात अर्ज भरून परीक्षा देत असते. मार्च २०१८ साली आरोपी महेंद्र काटकर याने राऊत यांच्या घरी येऊन, तुम्ही एका खाजगी शाळेत शिक्षक आहात, तुम्हाला पुरेसा पगार नाही. तर, तुमच्या पत्नीला रेल्वेमध्ये कायमस्वरुपी नोकरी लावतो, असे आश्वासन दिले. तसेच, रेल्वेत काही खास अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतील, असेही सांगितले.
त्यानंतर दोन-तीन दिवसांनी काटकर यांच्या समवेत अंकुश धाकडे, मनोज गायकवाड, मनीष वानखेडे राऊत यांच्या घरी आले. त्यांनी राऊत यांना रेल्वेत सर्व अधिकारी ओळखीचे आहेत. त्यांचे जवळचे संबंध आहेत. गावातील अनेक लोकांनी पैसे भरून त्यांच्याकडे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत, असे सांगून राऊत यांच्याकडून रक्कम लाटली. या युवकांनी राऊत यांच्यासह अनेक युवकांची फसवणूक करून एकूण १२ लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
हेही वाचा - बारामतीत नवरदेवासह डी.जे. चालकावर गुन्हा दाखल