पुणे - जिल्ह्यात अनेक गड किल्ले आहेत. मात्र, चाकण परिसरात असलेला संग्रामदुर्ग हा एकमेव भुईकोट किल्ला असून या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. याच संग्रामदुर्ग किल्ल्याच्या इतिहासातील लढाईतील दोन तोफांना रणगाडे तयार करुन लोकार्पन सोहळा करण्यात आला. मराठयांच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या या किल्लयाच्या प्रवेशद्वारावर दोन तोफगाडे उभारण्यात आले आहेत. हा उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठानच्या पुढाकाराने करण्यात आला आहे.
चौदाव्या शतकात उभारण्यात आलेला हा भुईकोट आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. हा किल्ला काबीज करण्यासाठी जेव्हा शाहिस्तेखान चाल करून आला होता. तेव्हा किल्ल्याचे सेनापती फिरोगोजी नरसाळा यांनी मोठी जिकीरीने शाहिस्तेखानाला ५५ दिवस याच किल्ल्यातून झुंजत ठेवत त्याच्यावर विजय मिळवला होता.
मराठ्याच्या स्वराज्याचे खरे वैभव म्हणजे गडकिल्ले आहेत. याच गडकिल्ल्यांकडे पाहिले की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ल्यांवर पुरातत्व विभागाचा ताबा आहे. तसेच या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योग्य पाऊले उचलण्याची गरज असल्याची भावना दुर्गप्रेमीमधून व्यक्त होत आहे.