बारामती (पुणे) - बारामती तालुका पोलिसांनी पाटस-बारामती रस्त्यावर सुमारे 47 लाख रुपयांच्या गांजासह दहा लाख रुपये किंमतीचा ट्रक, असा तब्बल 57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय जालिंदर कणसे (वय 22 वर्षे, रा.कानरवाडी. ता.कडेगाव, जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय 19 वर्षे, रा. नागेवाडी. विटा, ता.खानापूर, जि.सांगली), निलेश तानाजी चव्हाण (वय 32 वर्षे, रा. आंधळी, ता.माण, जि. सातारा), योगेश शिवाजी भगत (वय 22 वर्षे, रा. साबळेवाडी-शिर्सुफळ, ता.बारामती), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, चौघे गांजाची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना ही माहिती देण्यात आली. त्यावरुन पोलीस उंडवडी येथील ड्रायव्हर ढाब्याच्या जवळ सापळा लावून थांबले होते. माहितीनुसार ट्रक येताना दिसला हा ट्रक थांबवत ट्रकची झडती घेतली असता त्यात 11 पोती आढळून आली. त्या पोत्यात खाकी रंगाच्या 136 प्लास्टिकच्या बॅगांमध्ये गांजा भरलेला आढळून आला. तब्बल 312.874 किलो ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत 46 लाख 93 हजार इतकी आहे. याशिवाय 10 लाख रुपये किंमतीचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईचा पंचनामा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पुढे करण्यात आला. अलीकडच्या काळातील बारामतीतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, अनिल ओमासे, खेडकर, लोखंडे, मखरे, मरळे, काळे, नरुटे, राऊत, मदने, कवितके, जाधव, शेख यांनी केली.
हेही वाचा - भोर शहरात 27 सप्टेंबरपर्यंत टाळेबंदी