पुणे: रविवारी मध्यरात्री पुण्यातील बुधवार पेठेतील क्रांती चौकात काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता. यामध्ये काही तरुण कोयत्याचा धाक दाखवून हाणामारी करत असल्याचे दिसून येत होते. रविवारी रात्री हा प्रकार घडूनही फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र माध्यमात यासंबंधीच्या बातम्या येताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती: विशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली होती. आणि पोलिसांनी रोहित पसंगे रा.पर्वती पायथा, चैतन्य बैरागी रा. पर्वती पायथा आणि विजय डिखले रा.गुलटेकडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थांबले होते.
लाथा बुक्क्यांनी मारहाण: यावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकीवरील या तीन आरोपी तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर दुसरीकडे लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीवर वार केला आहे.
न्यायालयात हजर केले जाणार: मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या मित्रालाही आरोपींनी डोक्यात लोखंडी कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.