पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील १९० वर्ष जुना अमृतांजन पूल इतिहास जमा झाला असून सायंकाळच्या सुमारास तो पाडण्यात आला आहे. यावेळी काही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडायचा होता. परंतु, द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतमार्गावरील वाहतूक कमी आहे. त्यामुळे सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आला.
१० नोव्हेंबर १८३० साली अमृतांजन पूल बांधण्यात आला होता. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, महामार्गावरील वाहतुकीमुळे ते शक्य होत नव्हते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश लॉकडाऊन असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तसेच द्रुतगती मार्गावरही वाहतूक नेहमीच्या प्रमाणात खूप कमी आहे. सध्याची वाहतूक जुन्या महामार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे आज रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास (कंट्रोल बास्टिंग) पद्धतीने हा पूल पाडण्यात आला आहे. तो इतिहास जमा झाला असून पुलाखाली अत्यंत धोकादायक वळण आहे. तिथेच जास्त अपघात होतात. अनेकदा कंटेनरही अडकत होते. त्यामुळे हा पूल पाडणे गरजेचे होते.