पुणे - अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून राज्यात वाद सुरु झाला आहे. मात्र, याला ब्राम्हण महासंघ आणि विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे.
ब्राम्हणा महासंघाने का विरोध केला?
मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या, मराठी साहित्याचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिकांमधून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड केली जाते. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे आजवरचे लेखन पाहिले असता मराठी साहित्यातील कोणता विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ब्राम्हण मंहासंघाने म्हटले आहे. तसेच फ्रान्सिस आजवरची सर्व पुस्तके ही ख्रिस्ती धर्मावर आधारित आणि ख्रिस्ती धर्म हा इतर धर्मापेक्षा कसा चांगला आहे यावरच आधारित आहेत. ज्याप्रमाणे मदर तेरेसा यांचे काम ख्रिस्ती धर्म वाढीसाठी होते. तसेच दिब्रिटो यांचे लेखनही ख्रिस्ती धर्मासाठी असल्याचे महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत.
दवे म्हणाले, मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे काम शून्य आहे. मराठीचे विचार, मराठी संस्कृती याविषयी त्यांचे कार्य शून्य आहे. त्यांची अनेक पुस्तके अंधश्रद्धा पसरविणारी आहेत. असे असूनही अंनिसने त्यांना आजवर विरोध केला नाही. फक्त आणि फक्त सामाजिक उदात्तीकरण दाखविण्यासाठीच त्यांना हे पद दिले जात असल्याचही दवे म्हणाले. दिब्रिटो यांच्याकडे थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी स्वतःहून हे पद स्वीकारू नये. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन तातडीने त्यांची निवड थांबवावी अशी मागणी दवे यांनी केली आहे.
माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस काय म्हणाले?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्यावतीने ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीली धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. अनेक जाती धर्माच्या पिढ्यांचे योगदान मराठी साहित्यात असून या साहित्यिकांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केले आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मप्रसारक असले तरी त्यांनी संत साहित्य आणि निधर्मी साहित्य अश्या प्रकारचे साहित्य मराठी साहित्यात भर घालणारे आहे.
हेही वाचा - ९३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो