पुणे - भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जाहीर घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून काकडे भाजपविरोधी वक्तव्ये करून सतत चर्चेत होते. तर, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी खटकेही उडाले होते. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या काकडे यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवारांचीही भेट घेतली होती. मात्र, आता काकडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी यांना बाजूला सारत काँग्रेसच्या वाटेवर जात सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
सध्याची बदललेली परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाबद्दल माझी आधीपासूनच सकारात्मक भूमिका होती. या पक्षाच्या एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिले आहे. काँग्रेस हा त्यागातून तयार झालेला पक्ष आहे, अशी माझी धारणा आहे. हा पक्ष सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यासाठी मी काही दिवसांपासून दिल्लीत होतो. मी अनेक काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली आहे. अजून पक्षात प्रवेश घेतला नसला तरी लवकरच अधिकृत पक्षप्रवेश करणार आहे, असे काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, आगामी काळात पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो मला मान्य आहे. लोकसभेसाठी काँग्रेसकडून विचारणा झाल्यास समोर कोण असेल याचा मला फरक पडत नाही, असे सांगत त्यांनी गिरीश बापट यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले.
काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा झाली का? किंवा मुख्यमंत्र्यांबद्दल काय भूमिका आहे, असे विचारले असता, 'प्रत्येक पक्षाची विचारधारा ही वेगवेगळी असते. त्यामुळे पक्ष आपल्या जागेवर आणि मैत्री आपल्या जागेवर असे सांगत कुठल्याही पक्षात गेलो तरी मुख्यमंत्र्यांशी मैत्री कायम राहील', असेही काकडे यांनी स्पष्ट केले.
संजय काकडे हे भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी काकडेंनी चोखपणे पार पाडत भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवाय संजय काकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.