पुणे - काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मुंबईत मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत आहेत. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. काँग्रेसने अतिशय योजनाबद्धरित्या शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेले, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा - ..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत
यातून तयार होणारी पोकळी त्यांच्याकडून राज ठाकरेंच्या मनसेच्या रूपातून भरून काढली जाणार आहे. शिवसेनेचा चाहता म्हणून म्हणेन की, शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांनी हळूहळू शिवसेनेचा एक शर्ट काढला, पॅन्ट काढण्याचा प्रयत्न आहे. त्या जागी मनसेला आणण्याचा डाव असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, सभागृह नेते हेमंत रासने उपस्थित होते.
हेही वाचा - आशिष शेलारांविरोधात पुण्यात शिवसेनेची निदर्शने
पुढे ते म्हणाले, की सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून मनसे आणि भाजपचा विचार येत आहे. याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. हा काँग्रेसने आखलेला डाव आहे. हा डाव उद्धवजींनी समजून घ्यावा. ते वारंवार सांगतात, की मी हिंदुत्व सोडलेले नाही, मग त्यांनी ७ मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी करावी.