पुणे - भाजप आणि संघ परिवारातील ५ हजार स्वयंसेवक आणि कार्यकर्ते बारामतीत पाठवण्याचे आदेश भाजप नेतृत्वाने दिले आहेत. भाजपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी स्वतः बारामतीमध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बारामतीची जबाबदारी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहे. त्यानंतर पाटील हे बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र, बारामतीमध्ये सगळीकडे भाजपचे कॅडर उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रचाराला मर्यादा येत आहेत. यासंदर्भात मित्रपक्षांनीही भाजपचे लक्ष वेधले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपचे नेते प्रदीप रावत यांना कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला खडकवासला आणि बारामती विधानसभा मतदार संघात निमंत्रित केले आहे. त्यामुळे आमचे ५ हजार कार्यकर्ते विजयाची गुढी उभी करण्यासाठी बारामतीत जाणार असल्याचे प्रदीप रावत म्हणाले.