पुणे - शहरातील कोथरूड येथील महात्मा सोसायटीत शिरलेल्या त्या रानगव्याचा पाच तासाच्या बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि. 9 डिसें.) पहाटे पाचच्या सुमारास हा रानगवा स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली होती.
पुण्याच्या महात्मा सोसायटीमध्ये आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना गवा दिसला होता. त्यानंतर ही माहिती मिळाताच वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाने पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवत गव्याला बेशुद्ध करून त्याला ताब्यात घेतले होते. त्याचे चारही पाय बांधून ताब्यात घेऊन ट्रकमध्ये नेत असताना या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गव्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांतून हळहळ
महात्मा सोसायटी जवळच असणाऱ्या एनडीएच्या जंगलातून हा गवा आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. गव्याचे वय सुमारे चार वर्षे असून त्याचे वजन अंदाजे 800 किलो असावे, असा अंदाज आहे. दरम्यान रानगवा रस्ता चुकल्यामुळे बिथरला होता. बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. मात्र, गवा बिथरल्याने तेथील सदनिकांच्या भिंतींना धडका देत होता. त्यामुळे नाक, तोंडाजवळ जखम झाल्याने रक्त वाहत होते. गळ्यात फास बसल्याने गव्याचा दुर्दैवी मृत्यू आहे. यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात होती.
गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन अपयशी
सकाळी साडे नऊच्या सुमारास पोलीस, वन विभाग कर्मचारी आणि अग्निशामक दल दाखल झाले. बचाव कार्य सुरू झाले. यामध्ये तीनवेळा डार्ट इंजेक्शन दिल्यानंतर तो इंदिरानगर परिसरात बेशुद्ध पडला. दरम्यान त्याच्या गळ्यात फास लावून पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे गळफास बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरल्याचे दिसून आले.
हेही वाचा - कोथरूडच्या महात्मा सोसायटीत शिरला रानटी गवा, बघ्यांची गर्दी
हेही वाचा - पुण्यात दोन वर्षानंतर पुन्हा पेट्रोलचे दर नव्वदीत; नागरिकांच्या खिशाला कात्री