पुणे: हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात झाला. ही घटना 28 जानेवारीला रात्री 8 वाजता घडली. रिदा इम्तियाज मुकादम (वय 23, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार (वय 30, रा. वानवडी) जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यांना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत असताना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले.
ट्रकची धडक दुचाकीला बसली: दुचाकी चालवत असलेल्या नटराज आणि रिदा बाह्यवळणावरुन नवीन कात्रज बोगद्याकडे गेले. आपला रस्ता चुकल्याचे नटराजच्या लक्षात आले. नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसली. यामध्ये रिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक न थांबता निघून गेला. याबाबत नटारज याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.
विचार करून तंत्रज्ञानाचा वापर: आधुनिक तंत्रज्ञान कितीही माणसाच्या जीवनात उपयोगी असले, तर त्याचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण कधी कधी तंत्रज्ञान सुद्धा चुकते. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. गुगल मॅपवरून रस्ता शोधत असणाऱ्या एका तरुणीला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान वापरताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला सुद्धा विचार करून तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, नाहीतर आपला जीव सुद्धा जाऊ शकतो, पुण्यातील या घटनेवरून दिसून येत आहे.
एक प्रकारचा डिजिटल दिशादर्शक: आजच्या काळातील इंटरनेट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तसेच गूगल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या काळात इंटरनेट हे असे माध्यम आहे की, आपल्याला जगात कुठेही जायचे असेल किंवा मार्ग शोधायचा असला, तरी आपण आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉप इंटरनेटच्या मदतीने सहजपणे मार्ग शोधू शकतो, म्हणजेच गूगल मॅप नकाशाच्या सहाय्याने जगातील कोणत्याही कोपर्यात जाण्याचा मार्ग शोधू शकतो. गुगल मॅप्समध्ये नवनवीन फिचर उपलब्ध आहे. याच्याद्वारे आपणास कोणत्याही रस्त्याचे नावे, नगराची नावे, दुकानांची नावे, वास्तूंची नावे मंदिरांची नावे आंतरजालाशी जोडता येतात. हा एक प्रकारचा डिजिटल दिशादर्शक म्हणून काम करतो. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणचे आंतर आपल्याला सहज कळते. कागदी नकाशाची गरज पडत नाही.
हेही वाचा: Burhanpur Road Accident : बुरहानपूरमध्ये पिकअप आणि ट्रकची धडक, अपघातात 6 जणांचा मृत्यू