पुणे - बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. आता या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. भाजपा तसेच संयुक्त जनता दल यांनी सुरुवातीची पीछेहाट मोडून काढत आघाडी घेतलेली आहे. तर दुसरीकडे, आरजेडी आणि काँग्रेस यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, मात्र आता ते मागे आहेत. एकंदरीत हा ट्रेंड असाच राहिला तर, पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे सरकार येईल.
नीतिश कुमारांना केंद्रात संधी?
एकंदरीत सध्याचे ट्रेंड बघितले तर संयुक्त जनता दल 40 ते 45 जागांपर्यंतच मर्यादित राहण्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाच्या जागा 60-65च्या दरम्यान आल्या तर कदाचित भाजपा हा नीतिश कुमार यांना केंद्रामध्ये मोठे पद देऊ शकतो आणि बिहारचे मुख्यमंत्रीपदी स्वत:कडे ठेवू शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
मात्र सुरुवातीपासूनच निवडणुकीचे कल काहीही असले तरी, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नीतिशकुमारच असल्याचे भाजपाने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यांनी तो शब्द पाळला तर, पुन्हा एकदा नीतिश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र भाजपाने हा शब्द पाळला नाही तर, नीतिश कुमार, आरजेडी आणि कॉंग्रेस असेही समीकरण बघायला मिळू शकते. सर्व कल हाती आल्यानंतर बिहारचे पुढील चित्र स्पष्ट होईल, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण