बारामती - इंदापूर तालुका व परिसरामध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यात प्रवाशांना बळजबरीने अडवून मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर सावकारकी करणे, खंडणी मागणे, चोरी करणे, घरफोडी, मारामारी अशा प्रकारचे अकरा गंभीर गून्ह्याची नोंद असलेल्या गणेश पवार टोळीवर इंदापूर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. यातील चार आरोपींना इंदापूर पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. तर, यातील मुख्य आरोपी गणेश बाळासाहेब पवार (रा. वडारगल्ली, बाबा चौक इंदापूर) हा फरार असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. सदर टोळीतील राहुल बाळासाहेब पवार, दिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे (वय २०, रा. शेंडेमळा इंदापूर), विवेक पांडूरंग शिंदे (वय २०, रा. अंबीकानगर इंदापूर) व सागर नेताजी बाबर (वय १९ रा. अकलुज नाका इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशियीतांचे नावे आहेत.
मोक्काअंतर्गत कारवाई
अकरा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या पवार टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे कडक आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी इंदापूर पोलीस निरिक्षक धण्यकुमार गोडसे यांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी पवार टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. गोडसे यांनी पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, पूणे ग्रामिण अपर पोलीस. अधिक्षक मिलींद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पवार टोळीवर मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार करून, कोल्हापूर विशेष पोलीस महानिरिक्षक मनोज लोहीया यांचेकडे पाठवला होता. सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्याने पो. नि. गोडसे यांनी वरील आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.