पुणे - कोरोना संचारबंदीत सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. बारामती तालुक्यातील गुणवडी येथे सुरू असणाऱ्या अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बारामती शहर पोलिसांनी तीन लाखापेक्षा अधिक रकमेची दारू नष्ट केली. या प्रकरणी संतोष कांबळे आणि गौतम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, उपनिरीक्षक पद्मराज गंपले, उपनिरीक्षक योगेश शेलार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे २०० लिटर क्षमतेचे दारुचे १६ बॅरेल आणि काही रसायन पोलिसांनी नष्ट केले. याव्यतिरिक्त पंचवीस हजार रुपयांची इलेक्ट्रीक मोटार, वॉटर हिटर, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींवर मुंबई दारुबंदी अधिनियमासह, रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.