बारामती - नव्या वर्षांपासून शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास बारामती नगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेकडे गांभिर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता स्वच्छतेबाबत अधिक जागरूक रहावे लागणार आहे.
या मोहिमेतर्गंत शहरात नागरिकांना घरासमोर व व्यापारी आस्थापनांना आपल्या दुकानासमोर दोन कचरा पेट्या ठेवण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वांना सूचना करण्यात आली आहे. मात्र जानेवारी महिन्यात जर दोन कचरापेट्या ठेवल्या नाही, अथवा उघड्यावर कचरा टाकल्यास दंड करण्यात येणार आहे. केंद्राच्या स्वच्छ अभियानात बारामती शहर आणण्यासाठी नगरपालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबरपासूनच स्वच्छता मोहीम वेगात सुरू करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. शहरात सध्या ६० टक्के कचरा वर्गीकरण करण्यात येत आहेत.
जानेवारीपासून कचरा वर्गीकरण....
उर्वरित ४० टक्के नागरिकांमध्ये डिसेंबरमध्ये जनजागृती केली जाईल. जानेवारीपर्यंत शंभर टक्के कचरा वर्गीकरण झाले पाहिजे. यावर भर दिला जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार निर्मितीच्या जागी कचरा विलगीकरण करण्याची जबाबदारी ही संबधित कचरा निर्माण करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींची असल्याचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांनी सांगितले आहे.
स्वच्छतेचे स्वरूप....
कचरा वर्गीकरण करण्यास प्राधान्य
-सर्व वॉर्डांत जनजागृती केली जाणार
-ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना पटवून दिले जाणार
-चार प्रकारांत वर्गीकरण करण्यावरही भर
-सर्व प्रकारच्या घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण निश्चिती
-वर्गीकरण न केल्यास कचरा स्वीकारला जाणार नाही
-सांडपाणी प्रकल्पावर लक्ष केंद्रीत करणे
हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर, एकावर गुन्हा दाखल
असा असणार दंड......
रस्त्यांवर कचरा टाकल्यास -१८०
कचरा वर्गीकरण न केल्यास -२००
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १५०
उघड्यावर लघुशंका करणे- २००
उघड्यावर शौच करणे - ५००
हेही वाचा - बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न होत मुंडन आंदोलन