पुणे - जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात एटीएमची सुरक्षा रामभरोसे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक तैनात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून एटीएमच्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, बँकांकडून एटीएमबाहेर सुरक्षारक्षक नेमले जात नसल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चाकणमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडले
सामान्य नागरिकांना केव्हाही पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी बँकांकडून एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, या एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. औद्योगिक नगरी चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या प्रमुख शहरांमध्ये वाढते शहरीकरण पाहता याठिकाणी अनेक बँकांनी नागरिकांसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, हे एटीएमच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! बारामतीत कष्टकरी महिलांची तीन कोटींची फसवणूक
रहदारीच्या ठिकाणी आणि व्यापारी संकुलांमध्ये एटीएमची सेवा सुरू करण्यात आली. मात्र, याठिकाणी एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर दुसरीकडे सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांना एटीएममध्ये चोरी करणे सहज शक्य होत असल्याने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही बँका याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे.
हेही वाचा - जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
एटीएममध्ये होणारी चोरी यामुळे बँकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्राहकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर आजूबाजूला असणारे व्यापारी संकुल भीतीच्या छायेखाली असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे बँकांनी एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी व्यापारी करत आहेत.