पुणे- दरोडेखोरांनी एटीएम तोडून मशीनमधील रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चाकण तळेगाव रोडवरील खराबवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, एटीएम मशीनमध्ये किती रोख रक्कम होती हे अद्याप समजू शकली नाही.
चाकणमधील खराबवाडी गावातील भरवस्तीच्या चौकात व्यापारी संकुल असून येथे विविध बँकांची एटीएम आहे. यातील अँक्सिस बँकेच्या एटीएमला रात्री सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यावर हात साफ केला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा कलर मारला. त्यानंतर कुठलीही तोडफोड न करता अगदी सहजपणे गॅस कटरच्या सहायाने एटीएम मशीन कापले. आणि त्यातली रोख रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, दरोड्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, नागरिक, कामगार यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, असे असतानाही पोलीस या घटनांना रोखण्यात अपयशी होत आहे.
एटीएम सेटंरला सुरक्षा रक्षक का नाही..?
नागरिकांना कुठल्याही वेळेला पैसे उपलब्ध व्हावे यासाठी बँकांकडून एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एटीएम मशीनमध्ये लाखो रुपये ठेवले जातात. मात्र, या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यात येत नसल्याने चोरट्यांकडून एटीएम चोरीच्या घटना वाढत आहेत. याकडे बँक व्यवस्थापन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे मागील काही दिवसांपासून होणाऱ्या चोरीच्या घटनांमधून समोर आले आहे.
हेही वाचा- धक्कादायक..! बारामतीत कष्टकरी महिलांची तीन कोटींची फसवणूक