पुणे - भारतीय सैन्यदलाच्या गुप्तचर विभाग आणि पुणे पोलिसांनी बुधवारी केलेल्या एकत्र कारवाईत बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. पोलिसांनी यावेळी 87 कोटींचे बनावट चलन जप्त केले होते. या रॅकेटचा सूत्रधार शेख अलीम अब्दुल गुलाम हा सैन्यदलातील जवान असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना अटक केली असून, त्यांना आज कोर्टात हजर केले असता 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
बनावट नोटांच्या रॅकेटचा सुत्रधार सैन्यदलातील जवान पोलीस सहआयुक्त रवींद्र सिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परकीय चलन बदलून देण्यासाठी या बनावट नोटांचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. सूत्रधार असलेल्या शेख अलीम याने विमानतळ परिसरात भाड्याने बंगला घेतला होता. या बंगल्याचा वापर फक्त बनावट नोटांच्या व्यवहारासाठी केला जात होता. अटक केलेल्या आरोपींमध्ये लष्करात काम करणाऱ्या अलिमसह त्याचे सहकारी सुनिल बद्रीनारायण सारडा, अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान, अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान, रितेश रत्नाकर आणि तुफेल अहमद महमद इशोक खान यांचा समावेश आहे.
बनावट नोटांच्या रॅकेटचा सुत्रधार सैन्यदलातील जवान पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांवर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' असे छापलेले आहे. पोलीस सध्या त्या बंगल्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा बंगल्यात का ठेवल्या होत्या? त्या कोणाकडून आणल्या? त्याची छपाई कुठे करण्यात आली? या नोटांद्वारे व्यवहार करून आरोपींनी कोणाला फसवले आहे का? टोळीत अजून कोणाचा सहभाग आहे का? तसेच मुख्य सूत्रधार खान याचा या गुन्ह्यामागील उद्देश काय आहे? याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी आरोपींची 15 जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
बनावट नोटांच्या रॅकेटचा सुत्रधार सैन्यदलातील जवान