पुणे: कॉम्रेड भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये अनेक ठरावसुद्धा मंजूर करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्ग जैवविविधता नष्ट करून आम्ही रिफायनरी होऊ देणार नाही. सरकारने दमदाटी केली तरी आम्ही आमच्या प्रमाणे आंदोलन करणार असल्याचे भारत पाटणकर यावेळी म्हणाले.
तर संघर्ष तीव्र होणार: बारसू आंदोलनाची भूमिका ही राज्यव्यापी असल्याचे सांगत भारत पाटणकर म्हणाले की, इतरत्र जागा देऊन रिफायनरी करता येईल असे काहींचे मत आहे. मात्र, राज्यात अशी कुठलीही जागा नाही की, जिथे प्रदूषण होणार नाही आणि तिथली सगळी जैवविविधता एकत्र राहील; परंतु रिफायनरी विरोधातील आंदोलनाला यश आले तर पर्यायी व्यवस्था सरकार करणार आहे. हा महाराष्ट्राच्या प्रदुषणाचा, जैवविविधतेचा प्रश्न आहे. त्यामुळेच हे राज्यव्यापी आंदोलन व्हावे, यासाठी आज दोन बैठका घेतल्या गेल्या. यामध्ये दोन समित्यासुद्धा नेमलेल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या बैठकीत या समितीचे स्वरूप ठरविले जाईल. तसेच यावर पदाधिकाऱ्यांची भूमिका देखील मांडली जाईल. राज्य सरकार ऐकतच नसेल तर रस्त्यावरचा संघर्ष तीव्र करत आंदोलन करण्याचा इशारासुद्धा भारत पाटणकर यांनी दिला आहे.
बारसू रिफायनरी विरोधी आंदोलन सुरू झाले तेव्हापासून राजकीय आणि जनतेचा पाठिंबा मिळायला लागला होता. स्थानिक महिलांची आणि ग्रामस्थांची मागील दोन वर्षांपासूनची तपश्चर्या फळाला आली आहे. हे आंदोल बारसूबाहेर पडले असून कोकण, मुंबई आणि आता पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. हा लढा यशस्वी होण्यासाठी स्थापन झालेल्या समित्या पुढेही कार्यरत राहतील. -- सत्यजीत चव्हाण, प्रमुख, बारसू सोयगाव संघर्ष समिती
काय म्हणाले संघर्ष समितीचे प्रमुख? बारसू प्रकल्पविरोधी आंदोलनाला राजकीय पाठिंबा नसला तरी येथील लोक लढत आहेत. 24 एप्रिल पासून आंदोलनाना सुरुवात झाली. या आंदोलनाला यश आले असून ते बारसू बाहेरही गेले आहे. कोकण, मुंबईनंतर आज पुण्यात बैठक झाली आहे. या आंदोलनाला जागतिक पासून तर स्थानिकांपर्यंतचा पाठिंबा मिळत आहे. शासनकर्त्यांना योग्य संदेश देण्यासाठी बारसू आंदोलकांची मोट बांधणे गरजेचे आहे. हा लढा आता महाराष्ट्रभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. बारसू आंदोलक आपल्या एकीच्या बळावर राज्यकर्त्यांना ही रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडेल, असे यावेळी बारसू सोयगाव संघर्ष समितीचे सत्यजित चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा: