पुणे - बारामती पोलिसांनी २०१३ पासून चोरीस गेलेल्या ३१ मोटार सायकली कर्नाटक राज्यातून केल्या हस्तगत केल्या आहेत. या मोटरसायकल चोरी प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. अजित दशरथ आगरकर (रा.बेलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.
मागील तीन ते चार महिन्यांपासून सुर्यनगरी, एमआयडीसीसह बारामती शहराच्या परिसरातून मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बैठक घेवून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडीला आणण्याबाबत पोलिसांना सूचना दिल्या होत्या. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्या गुन्हे शोध पथकाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची जबाबदारी दिली. त्यानुसार तालुक्यातील मोटार सायकल चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले. तांत्रिक मदत घेऊन संशयित म्हणून अजित दशरथ आगरकर (रा.बेलवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे) याला ताब्यात घेतले.
आगरकर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बारामती शहर व आजूबाजूच्या परिसरातून मोटार सायकल चोरून त्या कर्नाटका वेगवेगळ्या ठिकाणी विकल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावरून सदर गुन्हे पथकाची टीम कर्नाटकात दाखल झाली. मात्र, लॉकडाऊन असल्याने तसेच स्थानिक भाषा येत नसल्यामुळे तपासात अनेक अडथळे आले. मात्र, पोलिसांनी प्रयत्न करून चोरीला गेलेल्या 15 लाख 50 हजार रुपये किमतीच्या ३१ मोटरसायकली वेगवेगळ्या गावातून हस्तगत केल्या.
हस्तगत केलेल्या मोटार सायकली बारामती तालुका पोलीस ठाणे, बारामती शहर पोलीस ठाणे, वालंचदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या होत्या. सदर आरोपी हा मोटार सायकल चोरीत सराईत असून तो हॅण्डल लॉक तोडून व बनावट चावी वापरून मोटार सायकल चोरत होता. त्या कर्नाटक राज्यात नेऊन वेगवेगळ्या गावात मिळेल त्या किंमतीला विक्री करत होता.
या कामगिरी बद्दल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांना ३० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक फौजदार दिलीप सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, होमगार्ड सचिन गायकवाड, शेखर आदलिंग, पोलीस मित्र मच्छिंद्र करे यांनी केली.