पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणी पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार आहे. पुणे न्यायालयात ही प्रक्रिया पार पडेल. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्चिती करण्यात येणार आहे. यातील तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात आहेत. तर ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट, 2013 रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला पुणे पोलिसांकडे असणारा तपास सीबीआयकडे (केंद्रीय अन्वेषण विभाग) गेला होता.
या प्रकरणात सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग) दोषारोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. तर ॲड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत.
या आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी विशेष न्यायालयात शुक्रवारी (दि. 3 सप्टेंबर) युक्तिवाद करण्यात आला. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी खटल्याची पार्श्वभूमी सांगत आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची मागणी केली. आरोपींवर कोणत्या कलमांखाली आरोप निश्चिती करायची आहे. याबाबत मंगळवारी (दि. 7 सप्टेंबर) सुनावणी होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
हेही वाचा - WORLD COCONUT DAY 2021 'हे' आहेत नारळाचे फायदे