पुणे - माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातील निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना माझा मान आणि अपमान आता तुमच्या हाती आहे, असे भावनिक आवाहन केले. सध्या अर्थसंकल्पाची धावपळ सुरू असूनही मी येथे साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तळ ठोकून आहे, असे ते म्हणाले. तसेच यामुळे सर्व राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीकरांनी ३० वर्षे माझ्यावर प्रेम केले आहे. बारामतीच्या होणार्या विकासाला मी केवळ निमित्त आहे. विकासासाठी तुमची मिळालेली साथ महत्वाची आहे. राज्यातील प्रत्येक राजकारणी त्यांच्या मतदार संघातील कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे तालुक्याचा विकास करताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे सहज शक्य होते, असेही अजित पवार सभेत म्हणाले.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री निलकंठेश्वर पॅनलचा पराभव करून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरू-शिष्याच्या जोडीने कारखान्यावर सत्ता मिळवली होती. त्यामुळे आता सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे.