पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवारांनी भाजपाची विचारधारा स्वीकारली आहे का, असा प्रश्न केला जात होता. या प्रश्नावर अजित पवारांनी पुण्यात उत्तर दिले. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी जरी विकासकामांसाठी तिथे गेलो असलो, तरी मी शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मागेदेखील शिवसेना काँग्रेस आणि आमचे सरकार असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरले होते. पण येथे त्याला वेळच नाही, कारण त्यांनी अगोदरच सरकार बनवलेले होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी यावा, तसेच राज्यातील विकासकामांना मदत व्हावी. आम्ही कामाला झोकून देणारी माणसं आहोत- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये शीतयुद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. पत्रकारांनी खऱ्या बातम्या द्याव्यात. थोडी माहिती घ्यायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. उदाहरण द्यायचे म्हटले, तर काल बातम्या चालू होत्या की, कोल्ड वॉर सुरू आहे. परंतु असे काहीही नाही. मुळात स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतात.आम्ही सत्तेत गेलो ते जनतेच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलो आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला पुढे घेऊन जात आहोत. मी अर्थमंत्री म्हणून बैठक घेऊ शकतो. पण शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात.
आपल्याला काय त्रास होतो, हेच कळत नाही. सरकार कोणाचेही असो शेवटचा आणि अंतिम निर्णय हे सर्वोच्च असणारे मुख्यमंत्री घेत असतात. जे कालपासून चाललं आहे, हे झाले ते झाले पण तसे काहीही नाही - अजित पवार, अर्थमंत्री
कोल्हापूरला ध्वजारोहण करणार : 15 ऑगस्टला स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने होत असलेल्या झेंडावंदनाबाबत अजित पवार म्हणाले की, ते अनेकवर्ष या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आपल्या येथे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचे ध्वजारोहण राज्यपाल करत असतात. तर मंत्रालयासमोर 15 ऑगस्टला मुख्यमंत्री आणि 26 जानेवारीला राज्यपाल ध्वजारोहण करतात. ही वर्षानुवर्षे परंपरा आहे. मला कोल्हापूर दिलेले आहे, यामुळे मी कोल्हापूरला जाऊन ध्वजारोहण करेन, असे अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेत्यावर टीका : पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला. शिवाय त्यांनी विरोधीपक्षनेते विजय वडेवट्टीवार यांच्यावरही टीका केली. पत्रकार काहीतरी बातम्या शोधतात आणि गैरसमज पसरवातात, असे अजित पवार यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन 2 दिवस गावाला गेले का, असे विचारले असता अजित पवारांनी विजय वडेवट्टीवार यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेत्यांनी ते सांगितले आहे. पण त्यांचे पद हे जबाबदारीचे पद आहे. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना प्रवासाचा त्रास झाला होता. आम्ही सांगितले की, त्यांनी 1-2 दिवस विश्रांती घ्यावी. विरोधी पक्षनेते हे उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, अशी टीका त्यांनी केली.
सर्वाच्च न्यायालय हे सर्वाच्च : माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला. आता नवाब मलिक कोणत्या गटात जाणार आहे, यावर चर्चा होत आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कारण नसताना आमची बाजू आणि तुमची बाजू असले काहीही करू नका. प्रत्येकजण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. हा न्यायव्यवस्थेचा अधिकार असतो. याबाबत सर्वाच्च न्यायालय हे सर्वाच्च आहे. त्याबाबत मला जास्त बोलायचे नाही.
मी तुम्हाला का सांगू : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना म्हणाले की, हे मी तुम्हाला का सांगू? राजकीय ज्या काही गोष्टी असतील मी माझ्यापर्यंत ठेवणार आहे. जे सार्वजनिक आहे ते सार्वजनिक आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराच्यावेळी मी मुंबईला जात होतो आणि पवारसाहेब दिल्लीला जात होते. तेव्हा मला सांगण्यात आले की, साहेब व्हीआयपी विभागात बसले आहेत. तेव्हा मी तिथे जाऊन साहेबांना भेटलो आणि मला जे सांगायचे होत ते मी सांगितले.
हेही वाचा-