पुणे : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार आहे. त्याच त्याच गोष्टी उकरून काहीही साध्य होणार नाही. राज्यात अनेक विषय आहेत, त्याच्यावर काय होणार आहे का? मला काही वाटत नाही.
भेटणार तेव्हा विचारणार : पुण्यात वृद्धेश्वर सिध्देश्वर मंदिराच्या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पाहिले आहे. जेव्हा मी त्यांना भेटणार तेव्हा मी देवेंद्रजी यांना विचारील की, का असे स्टेटमेंट यावेळी त्यांनी केले. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो नाही. यावेळी त्यांनी हे वक्तव्य का केले मला माहीत नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
राजकीय वर्तुळात खळबळ : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लीपमधील आवाज ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. जितेंद्र आव्हाडांनी याबाबतचे आरोप केले असून कारवाईची मागणी केली आहे. कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कसबामध्ये काळजीचे वातावरण : भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी गुरूवारी पुण्यात मेळावा घेतला. आजारी असताना देखील ते मिळवायला उपस्थित होते. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की बुधवारी भाजपचे नेते त्यांना भेटले त्यांचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस होय. फडणवीस यांनी बापट यांना सांगितले की, कसबामध्ये काळजीचे वातावरण आहे. त्यांनी आव्हान केले असेल. आजारी जरी असले तरी त्यांनी मेळावा केला आहे. पक्षाने त्यांना आग्रह केला असे वाटते. बापट यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यांनी एक गोष्ट ठरवली की ते पूर्ण करतात. देवेंद्रजी यांनी काही सांगितले म्हणून ते बाहेर पडले असतील, असे यावेळी पवार यांनी सांगितले.
सक्त कारवाईची मागणी : दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की ज्या अधिकाऱ्याचा कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे, त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई झाली पाहिजे. जितेंद्र आव्हाड, त्यांचं कुटुंब आणि राज्यातील प्रत्येक सामान्य नागरिकाला सुरक्षा पुरवणे, हे सरकारचे काम आहे.
विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, हेही सरकारचे काम आहे. जर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतील आणि सरकार याकडे डोळेझाक करत असेल, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. वास्तविक हे प्रकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे. कारण तो परिसर स्वत: मुख्यमंत्र्यांचा म्हणून ओळखला जातो. तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे पोलीस खाते आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे या दोघांचे काम आहे. संबंधित प्रकरणात कोण खरं बोलतोय? कोण याच्या पाठीमागे आहे? कुणी सुपारी दिली? या कटकारस्थानाचे कारण काय? हे सगळं शोधलं पाहिजे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
पोट निवडणुकीत पाठिंबा : कसबा पोट निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर गुंड असल्याचे सांगितले जात आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. मंत्री असे वागत असेल. गुंड प्रवृत्तीला घेऊन दहशत निर्माण केली जात असेल तर इथल्या आयुक्तांनी नोंद घेतली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीचे वागत असतील तर पुण्यात हे खपवून घेणार नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले. मनसेने भाजपला पोट निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. यावर अजित पवार म्हणाले की, मनसेसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला म्हणजे आमचे धाबे दणाणले आहे, असा मिश्किल टोला यावेळी पवार यांनी लगावला आहे.