पिंपरी चिंचवड(पुणे) - राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, असे विधान करुन शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला हे विधान केलं. तर लगेच दुपारी साताऱ्यात याच विधानारुन पवारांनी घुमजाव केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा संभ्रम वाढला आहे.
काकांच्या विधानावर पुतण्याची चुप्पी - या सर्व विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अजित पवार यांनी सुरुवातीला 'नो कॉमेंट्स' असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. संविधानानं ज्या पद्धतीनं पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, तसा मलाही माझं मत मांडण्याचा अधिकार दिला, असं म्हणत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.
काही तासात वक्तव्यावरून घुमजाव - शरद पवारांनी सकाळी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं. बारामतीहून शरद पवार दुपारी सातार्यातील दहिवडीच्या कार्यक्रमासाठी आले असताना सकाळी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी घुमजाव केलं. अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी बोललोच नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण-भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असा खुलासा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अजित पवारांचं जंगी स्वागत - उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल 550 किलोचा हार आणला होता. रावेत, वाल्हेकरवाडी येथे अजित पवार यांचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी ढोल, ताशांसह फुलांची उधळण करण्यात आली.
स्वागतावेळी स्विकारले निवेदनं - अजित पवारांच्या कृतीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अजित पवार नेहमी आपल्या कामात व्यस्त असतात. त्यांचं स्वागत होत असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांच्या कामाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. स्वागतावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्विकारत काम करण्याचं आश्वासनही दिलं.
पालिकेत अधिकाऱ्यांची खरडपट्टी - शहरात पाच ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अजित पवार यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत शहरातील विकासकामांबाबत आयुक्त, अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्याचवेळी पुढील नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी त्यांच्यासमोर सादरीकरण केलं. अजित पवार यांनी विकासकामांबाबत आयुक्त, अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. तसेच काम वेळेवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा -