पुणे - शिखर बँकेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. 11 हजार 500 कोटींच्या ठेवी असताना 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आमच्या आरोप केले जातात. म्हणजे हे तर अस झालं म्हशीला रेडकू झालं आणि म्हशीपेक्षा रेडकूच मोठं झालं, हे कस शक्य आहे?, असा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फैलावर घेतले. तसेच शरद पवार त्या बँकेचे साधे सभासदही नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची मांडवगण फराटा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
तीन महिन्यात सात-बारा कोरा करू
आजपर्यंत सेना-भाजपने जी आश्वासने दिली व यापुढे आश्वासने देण्याचे सुरु आहेत. त्यावर अजित पवारांनी लक्ष करत सेनेने शेतकऱ्यांना एकीकडे कर्जमुक्ती केली तर भाजपने कर्जमाफी दिल्याचा बागुलबुवा केला. पण, आज शेतकऱ्यांची काय अवस्था झाली हे दिसत आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.पण, मागील पाच वर्षात भाजपने केले काय असा सवाल करत शेतकऱ्यांची पिकेही पाण्यावाचून करपून गेली, असा आरोप आजित पवार यांनी यावेळी केला. जर आघाडीची सत्ता आली तर आम्ही केवळ 3 महिन्यातच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी केले.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्नर येथील अतुल बेनके ,राजगुरुनगर येथील दिलीप मोहिते पाटील, शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील अशोक पवारांच्या मतदार संघात संभोधित करत भाजप व शिवसेना यांच्यावर लक्ष केले.
मुख्यमंत्री, कोणता चष्मा घातलाय...?
देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत म्हटले होते की, आम्ही तेल लावून उभे आहोत, पण, पुढे आम्हाला एकही पैलवान दिसत नाही, यावर प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले, कोणता चष्मा घातलाय तुम्ही? जर पैलवान दिसत नसेल तर मोदी, शाह यांसारखे देशपातळीवरील नेते का घेऊन येत आहात..?
1 कोटी नोकऱ्या म्हणजे मोठं गाजर
मागच्या निवडणुकीत 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. यंदा 1 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन भाजप करत आहे. यांच्या विविध करप्रणालीमुळे उद्योगधंदे डबघाईला आले असून तरूणांच्या नोकऱ्या गेले आणि 1 कोटी नोकऱ्याचे आश्वासन म्हणजे मोठं गाजर आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर अजित पवारांनी केली.