पुणे - राज्याचा कारभार राज्याने करावा आणि केंद्राचा कारभार केंद्राने करावा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल प्रकरणावर दिली. कारभार करत असताना काही चुकीचे घडले तर केंद्राने लक्ष द्यावे, असेही पवार म्हणाले.
कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा त्यांचे मत मांडल्याचे अजित पवार म्हणाले. मात्र, राज्याचा कारभार राज्याने करावा आणि केंद्राचा कारभार केंद्राने करावा असेही पवार यावेळी म्हणाले. कोरेगाव भीमा येथे जी घटना घडली, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जातीय सलोखा राखण्यासाठी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही चौकशी करणार होतो. माञ, केंद्राने हा तपास अचानक एनआयएकडे सोपवल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आली. त्यानंतर अजित पवार बोलत होते.