पुणे - पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सांगता शनिवारी झाली आहे. या मतदारसंघांसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. एकंदरीतच पुणे जिल्ह्यातील या दोन्ही लढती लक्षवेधी ठरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्ताच्या उपाययोजना केलेल्या आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २ हजार ५०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. यातल्या पाचशे लोकांवर कलम १४४ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. मतदानाच्या आधी चार दिवस या लोकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे, तसेच आठ टोळ्यांना तडीपार करण्यात आले आहे. तर जवळपास वीस लोकांना एक वर्षासाठी परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.
गेल्या दीड महिन्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी १ कोटी १० लाखांची रोकड जप्त केली आहे. आर्म्स अॅक्टनुसार नुसार २८ कारवाया करण्यात आल्या आहेत. ५६ विविध शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. ७० हजार लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. या निवडणूक काळात शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. सुरक्षा दलाच्या पाच कंपन्या ग्रामीण पोलिसांना बाहेरून मिळालेल्या आहेत त्यात दोन एसआरपीएफ तीन सीआरपीएफच्या कंपन्यांचा बंदोबस ग्रामीण पोलिसांच्या सोबत आहे. जिल्ह्यातले अडीचशे अधिकारी २ हजार ५०० पोलीस कर्मचारी, एक हजार होमगार्ड दंगा नियंत्रण पथक धडक कारवाई पथक असे चार ते साडेचार हजार सुरक्षा बल याठिकाणी असणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे, खासकरून मावळ मतदार संघावर पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. मावळची पार्श्वभूमी लक्षात घेता सध्या असलेली चुरस या बाबींवर पोलिसांनी या भागात विशेष लक्ष दिले आहे.