पुणे - इंदोरीकर महाराजांची लोकांमध्ये क्रेझ आहे. लाखो लोक त्यांना ऐकतात त्यामुळे त्यांनी सामाजिक आणि सार्वजनिक व्यासपीठावर बोलत असताना महिलांचा सन्मान राखणे गरजेचे आहे, असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. मुलींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ घेण्याची वेळ आली. ही दुर्दैवी बाब असल्याचेही आदिती म्हणाल्या.
त्या मावळ येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मुलींच्या मनामध्ये भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची, शिक्षकांची, आई-वडिलांची आणि समाजाची देखील आहे. अवघ्या १४-१५ वर्षाच्या मुलींच्या मनामध्ये असे विचार येणे हे आपले अपयश आहे. मुली आणि मुलांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन आणि प्रबोधन मिळणे गरजेचे आहे, असे आदिती यांनी सांगितले.
हेही वाचा - कांदा दरासाठी अनोखी शक्कल.. डोनाल्ड ट्रम्प दाम्पत्याला पाठवली गांधीटोपी, उपरणे, साडी अन् कांदे
इंदोरीकर महाराजांसारख्या लोकप्रिय व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना भान ठेवले पाहिजे. आपण आपले वैयक्तिक मत मांडत असलो तरी आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे बोलताना दक्षता घेतली पाहिजे असे त्या म्हणाल्या.