पुणे - पुण्यातील काही भागात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळल्यामुळे हे भाग सील करण्यात आले आहेत. या भागातील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. किराणा साहित्य, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अशा भागात 10 ते 12 या दोन तासांसाठी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. आपला परिसर सोडून इतर परिसरात फिरताना काही नागरिक आढळले आहेत. यावर कारवाई करत स्वारगेट पोलिसांनी गुरूवारी सकाळपासून 150 लोकांना ताब्यात घेतले. आणि त्यांची वाहने जप्त केली. पोलिसांनी त्यांना दोन ते तीन तास बसवून ठेवले आणि त्यानंतर पायी चालत घरी पाठवले.
विनाकारण फिरणारे हे नागरिक स्वतःसह पोलिसांचाही जीव धोक्यात टाकत आहेत. त्यांची ही वर्तणूक चुकीची असल्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मा नाईकवडी यांनी दिली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट..! अखेर वडाळ्यातील कोरोना हॉटस्पॉट झालेले बीपीटी रुग्णालय सील
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही कारणास्तव नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे, आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या आवाहनाला झुगारून काही नागरिक रस्त्यांवर मुक्त संचार करत आहेत. अशांना अद्दल घडविण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.