पुणे - शिर्डीतील एका खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. या आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पळ काढल्याचे समोर आले. समीर अक्रम शेख (रा. शिर्डी) असे पळून गेलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. आज (शुक्रवारी) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केल्याने होता रुग्णालयात -
समीर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोपरगाव येथील कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. याच कोठडी त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन कर्मचारीही उपस्थित होते.
आज पहाटे समीर त्याच्या बेडवर नसल्याचे तेथे उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णालयात त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्यानंतर तो पळून गेला असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित कर्मचाऱ्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.