पुणे - डेटिंग साईटवरून श्रीमंत महिलांना आणि आयटीयन्स महिलांना हेरून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित ठगास पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 98 लाखांची रोख रक्कम, एक महागडी कार असा कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिकेत सुरेंद्र बुबने (वय 31 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या तो अटकेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील एका श्रीमंत महिलेला फूस लावून एकाने तब्बल पावणेदोन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे एक पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती.
तपासादरम्यान, आरोपी हा फसवणूक करण्यासाठी सोशल मीडियावरील डेटिंग साईटचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या एका डेटिंग खात्याची पडताळणी करून एका जुन्या मैत्रिणीचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन आरोपीला बाणेर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर भेटण्यासाठी आला असता आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
अशा पध्दतीने आरोपी ओढायचा महिलांना जाळ्यात
अनिकेत उच्चशिक्षित असून त्याने एमसीए केले आहे. एका रेस्टॉरंटचा तो मालकही आहे. डेटिंग साईटवर त्याने स्वतःच्या नावाने चार बनावट अकाउंट तयार केले होते. यावरून तो श्रीमंत आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीशी मैत्री करायचा. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. लग्नाच्या आमिषाने त्यांच्याशी जवळीक साधायची. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे. ही त्याची फसवणूक करण्याची पद्धत होती. त्याने अशाप्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशाप्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
हेही वाचा - पुण्यात हॉटेल चालकाचा खून.. कोयत्याने सपासप केले वार